वैजापूर, (प्रतिनिधी) समृद्धी महामार्गावर प्राण्यांची अवैध आणि क्रूर पद्धतीने वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सकाळी पोलिसांनी नागपूर कॉरिडॉरवर कारवाई करत गोवंश भरलेली पाच - पिकअप वाहने पकडली असून, घटनास्थळावरून १९ लाखांची जनावरे आणि वाहने जप्त केली आहेत.
समृद्धी महामार्गावरून काही वाहनांमध्ये गोवंशाची क्रूरपणे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्र. ४८८ जवळ नाकाबंदी केली. सकाळी साडेनऊच्या सुमारास संशयित वाहने अडवून त्यांची तपासणी केली. गुरांना कोंबून घट्ट बांधले होते. त्यांना हालचाल करण्यासाठीही जागा उरली नव्हती. चारा पाण्याविना अत्यंत दयनीय, गुदमरणाऱ्या आणि छळाच्या स्थितीत नेले जात होते.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान पिकअप आणि टाटा वाहनांसह गोवंश ताब्यात घेतले. वाहनचालक अमोल गिरे, लक्ष्मण चौरमले, विशाल कदम, सचिन मोकले आणि अभिषेक रकटे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.















